Thursday, July 20, 2023

 


    मानसशास्त्र - मानसिक प्रक्रिया व मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारे एक शास्त्र. शास्त्र म्हणजे विज्ञान यासाठीच की याच्यामध्ये इतर विज्ञानाच्या शाखांप्रमाणे प्रयोग, निरीक्षणे केली जातात. या अर्थाने हे एक नॅचरल सायन्स ही आहे व मानव्यविद्या शाखा सुद्धा आहे ज्यात सामाजिक वर्तन, अभिवृत्ती, कौशल्य, अभिरुची, ताण तणाव व्यवस्थापन, करियर यांसारख्या मानवी दैनंदिन जीवनाशी निगडित असणाऱ्या समस्यांचा व त्यांच्या उपायांचा अभ्यास केला जातो.

 

      अगदी सुरुवातीला म्हणजे प्लेटो, अॅरिस्टॉटल पासून मानवी व्यवहारांचा आणि वर्तनाचा अभ्यास केला जात होता पण त्याकाळी हा विषय तत्वज्ञानामध्ये येत असे. जर्मनीमध्ये लीपझिंक येथील प्रयोगशाळेत १८७९ ला पहिल्यांदा विल्यम वूंट या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्रीय प्रयोगाला सुरुवात केली तर त्याच सुमारास अमेरिकेमध्ये विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाने ' प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी' हा ग्रंथ लिहून मानसशास्त्र विषयाचा पाया रचला. त्यानंतरच्या काळात सिग्मंड फ्रॉईड  अल्बर्ट एलिस, कार्ल युंग, अँडलर, अल्बर्ट बांडुरा, एरिक एरिकसन या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मानसशास्त्राचे सिद्धांत मांडले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानसशास्त्रामध्ये सिद्धांत निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली ज्यात अध्ययन कसे होते व त्याचे प्रकार, स्मृती प्रक्रिया व त्याचे प्रारूप, व्यक्तिमत्व म्हणजे काय? व त्याचे प्रकार, भावना व भावनांचे प्रकार, भावना व अंतर्स्त्रावी ग्रंथी यांचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम, प्रेरणा व प्रेरणांचे प्रकार, मानवी जीवनात प्रेरणांचे असणारे महत्त्व, एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे, वस्तूचे होणारे संवेदन, संवेदनाच्या मुळाशी असणारे वेदन व अवधान ही शारीरिक स्थिती, चुकीच्या संवेदनातून होणारा भ्रम / भास (Illusion) तर अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीचे होणारे संवेदन म्हणजे विभ्रम (Hallucination) यांसारख्या असंख्य संकल्पनांची सिद्धांताची निर्मिती झाली.

 

     तर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या सर्व सिद्धांताचा मानवी जीवनात कसे उपयोजन करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला जसे अध्ययन कसे होते? अध्ययनाचे प्रकार कोणते हे समजल्यानंतर 'अध्ययन कौशल्य' आत्मसात करणे सुरू झाले. स्मृती आणि स्मृतीची प्रक्रिया समजल्यामुळे 'स्मृती सुधार तंत्रे ' अस्तित्वात आली. वैद्यकशास्त्राच्या विकासातून आज मोठ्या प्रमाणात मनोविकारांवरती औषधे उपलब्ध झाली आहेत.

 

     वैकासिक मानसशास्त्रामध्ये तर मातेच्या गर्भात भ्रुणाची निर्मिती होण्यापासून ते त्याचा जन्म, शिशु अवस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यवस्था व वृद्धावस्था या सर्व अवस्थांमध्ये शारीरिक-मानसिक-भावनिक व सामाजिक स्थित्यंतराचा अभ्यास केला जातो. स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे याने तब्बल 30 वर्षे शेकडो बालकांचा अभ्यास केला, वैकासिक मानसशास्त्राचे अनेक सिद्धांत हे जीन पियाजेच्या अनेक वर्षांच्या निरीक्षण, प्रयोग व त्याच्या अथक परिश्रमातून तयार झाले आहेत.

 

    तर असे हे मानसशास्त्र जे आपल्या जन्माच्या अगोदर पासून ते आपल्या जन्मानंतर मृत्यूपर्यंत आपल्या प्रत्येक मानवी प्रक्रियेचा व वर्तनाचा अभ्यास करते मानसशास्त्राच्या सामान्य मानसशास्त्र (मूलभूत सिद्धांत),  वैकासिक मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, इत्यादी शाखांचा अभ्यास केलेला पदवी व पदव्युत्तर पदवी घेतलेला विद्यार्थी आता स्वतःस ओळखण्यास सक्षम होतो जो स्वतःस चांगल्या पद्धतीने ओळखतो, आपण आज जे काही आहोत ते कशामुळे आहोत, आपल्या वर्तनामागे कोणत्या प्रेरणा आहेत, आपण आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो का? आपल्या भविष्यावरती आपले नियंत्रण आहे का? असेल तर किती प्रमाणात. इत्यादी 'स्व' शी संबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकतो. जो स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो तो इतरांनाही ओळखण्यास सक्षम होतो. त्यातून त्याला इतरांच्या वर्तनामागील असणाऱ्या कारणांचा शोध लागू शकतो आणि एकदा हे कारण समजले की मग त्या व्यक्तीशी कसे व्यवहार करायचे हेही त्याला समजू शकते. यातून त्याचे इतरांशी असणारे नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल जे सामाजिक जीवनात खूप महत्त्वाचे आहे. यातुन त्याच्यासाठी करियरच्या अनेक वाटा सुरु होतात.

 

    चला तर मग अशा आत्माविष्काराकडे (Self-Actualization) घेऊन जाणाऱ्या मानसशास्त्राच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करूयात.

 

     प्रा. सोमनाथ पाटील

                    एम.ए. सेट (मानसशास्त्र)

                   सहाय्यक प्राध्यापक

                  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

3 comments:

कायझेन, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-विद्यार्थी

  कायझेन, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-विद्यार्थी कोणतीही गोष्ट एका रात्रीत घटक नसते त्याच्या पाठीमागे कितीतरी वर्षांची तयारी असते . मग ती ...