Tuesday, November 21, 2023

कायझेन, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-विद्यार्थी

 

कायझेन, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-विद्यार्थी

कोणतीही गोष्ट एका रात्रीत घटक नसते त्याच्या पाठीमागे कितीतरी वर्षांची तयारी असते. मग ती एखाद्याचे एखाद्या क्षेत्रातील यश असो किंवा एखाद्या संस्थेचे / कंपनीचे / व्यवस्थापनाचे मोठे यश असो. मोठ्या गोष्टीत यश मिळविण्यासाठी लहान लहान गोष्टी व्यवस्थित व निटनीटक्या होणे गरजेचे असते. याच तत्वावरती जपानचे कायझेन हे तंत्र काम करते.

            आजकाल जपानच नाही तर जगातल्या मोठ मोठ्या देशांमधील मोठमोठ्या कंपन्या या तंत्राचा उपयोग करत असल्याचे आढळून येते. भारतीय उद्योग विश्वाने देखील  १९९१ नंतर जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर या तंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यास सुरुवात केली. कायझेन संदर्भात माझं पहिलं वाचन माझ्या वडिलांच्या काम करत असणाऱ्या कंपनीतल्या वार्षिक अंकाने झाली.  कराडमधील किर्लोस्कर कोपलँड (नंतरची इमर्सन) या कंपनीचा वार्षिक अंक दर वर्षी आमच्या घरी यायचा. त्यावेळी किर्लोस्कर कंपनीचा इतिहास, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी केलेली कंपनीची स्थापना व शंतनुराव किर्लोस्कर यांनी कंपनीला जागतिक स्तरावरती कसं नेलं इत्यादींबद्दल माहिती असायची परंतु त्याचवेळेस कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर कायझेन बद्दलही त्यात बरीच माहिती असायची. कदाचित माझ्या कार्यपद्धतीत त्यावेळेच्या (विद्यार्थीदशेत झालेल्या संस्कारांचा काहीतरी भाग असावा) झालेल्या संस्कारामुळे सुटसुटीतपणा व नीटनिटकेपणा आला असावा असं मला कदाचित वाटतं.  

            प्रसंग १ (साधारण २०१४-२०१५)- नंतरच्या काळात मी पुण्यात जॉबला असताना कधीतरी वेफर्स-बिस्कीट बस किंवा रेल्वे प्रवासामध्ये खायला घ्यायचो. खाऊन झाल्यानंतर त्याचे प्लास्टिकचे रिकामे झालेले पाकीट त्या स्थानकावरील कचरा कुंडीत टाकायचो. एखाद्या स्थानकावरती ती कचराकुंडी कुठतरी लांब असलेली, ओवरफ्लो झालेली बघितली की ते पाकीट माझ्या सॅक मध्ये टाकून रुमवरती घेऊन जायचो आणि तितल्या आमच्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचो. हे करताना माझ्या एका रुममेटने मला एकदा –दोनदा बघितले. आणि ‘तू हे असं काय करतोय?’ अशा त्याच्या प्रश्नावरती माझा योग्य तो खुलासा ऐकून नुसती हलकीशी स्माईल द्यायचा. काही दिवसानंतर त्यानेही असं करताना मी बघितलं आणि मला समाधान वाटलं. आपल्या वर्तनाच चांगलं निरीक्षण करून कोणीतरी चांगली सवय लावून घेतली.

            प्रसंग २ (दिवाळी २०२३) – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माझी पत्नी आणि मुलगी माहेरी गेली होती सुट्टीला. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर त्यांना रिसीव्ह करायला मी कराड बस स्थानकावरती गेलो होतो. त्या दोघींना बस मधून खाली उतरवत असताना माझ्या तीन वर्षांच्या मुलीची काहीतरी गडबड चालली होती त्यांच्याबरोबर असणाऱ्या सॅक कडेच्या कप्प्यात काहीतरी ठेवण्याची, मी खाली उतरल्यानंतर मुलीला विचारलं ‘अगं काय करतीयस तू?’ त्यावर आमच्या सौ. म्हटल्या ‘अहो! तिला तुमची सवय लागलीय प्लास्टिकचा कागद इकडे-तिकडे न टाकता बॅग मध्ये टाकायची’. मी कौतुकाने, समाधानाने फक्त हसलो. विशेष म्हणजे आम्ही तिला हे कधीच शिकवलं नव्हतं की कचरा किंवा प्लास्टिकचा कागद असा सार्वजनिक ठिकाणी नसतो टाकायचा, पण तरीही तिने वडिलधाऱ्या माणसांच्या निरीक्षणातून ही गोष्ट आत्मसात केली होती. त्याच्यावरून मला बांडूराचा निरीक्षणात्मक अध्ययन (Observational Learning) हा सिद्धांत आठवला ज्याचा प्रयोग त्याने लहान मुलांवरती सत्तर-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीच केला होता. लहान मुले निरीक्षणातून कोणतीही गोष्ट (चांगली किंवा वाईटही) कशी पटकन शिकतात हे सप्रमाण त्याने दाखवून दिलं होतं. आपल्यावरती संस्कार हे कुटुंबातून तर होत असतातच पण त्याच बरोबर शाळा, महाविद्यालये यांचही कार्य खूप मोठं असतं यात. लहान मुलं शाळेत जायला लागल्यापासून त्यांच्यावरती समवयस्क मित्रांचा व शिक्षकांचा खूप मोठा पगडा असतो. अशा वातावरणात त्या शाळा / महाविद्यालये यांनी या विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार, मूल्यशिक्षण, नैतिक मुल्ये यांसारख्या गोष्टींची पेरणी केली तर पुढे जाऊन हेच विद्यार्थी समाजासाठी, देशासाठी चांगले कार्य करू शकतील.

            तर कायझेन या तंत्राचा उपयोग मोठ मोठ्या संस्था / कंपन्यामध्ये जसा होतो तसा तो एका लहान कुटुंबामध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये सुद्धा छोटे छोटे चांगले बदल करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो असं मला वाटतं. हे बदल कदाचित त्यावेळी त्या एका व्यक्तीपुरते / संस्थेपुरते मर्यादित असतील पण भविष्यात त्याचे मोठे परिणाम पहावयास मिळू शकतील. त्यामुळे या ‘कायझेन’ तंत्राबद्दल आपण पालकांनी, शिक्षकांनी माहिती करून घेऊन आपल्या आयुष्यात छोटे छोटे चांगले बदल करण्यास सुरुवात करावी. याच्याबद्दल आजघडीला मार्केटमध्ये भरपूर पुस्तके पाहायला मिळतील. तसेच आत्ता शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरशी सलग्नित असणाऱ्या महावीर कॉलेज, कोल्हापूरच्या प्राध्यापक सुरेश संकपाळ यांनी छान लेख लिहिला आहे. ‘कायझेन’ तंत्र नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकदा हा लेख नक्की वाचवा असं मी सर्व वाचकांना सुचवेन.

शिक्षकांना / शिक्षकेतर कर्मचारी यांना करता येण्यासारख्या गोष्टी –

१)    प्रिंट काढत असताना तिची असणारी सॉफ्ट कॉपी याच्यावरती योग्य ते पूर्ण काम झाले आहे का ते तपासावे. आपल्याला ज्याची प्रिंट काढायची आहे तो भाग ‘ओके’ आहे असं समाधानकारक उत्तर स्वतःला मिळाल्यानंतर प्रिंट काढावी.

२)    प्रिंट काढताना ती कागदाच्या दोन्ही बाजूला काढली तर चालेल का? चालत असेल तर दोन पेजेस व्हाया न घालवता एकाच पेजवर दोन्ही बाजूने प्रिंट काढावी.

३)    ज्याची प्रिंट काढतोय, त्याची प्रिंट काढणे खरेच गरजेचे आहे का? का संबंधित व्यक्तीला फक्त सॉफ्ट कॉपी WhatsApp, Mail केली तरी चालू शकेल याची खात्री करावी.

   (पेजेसच्या बाबतीत एवढा विचार कशासाठी.... आपल्या भारतात एकूण ४५००० उच्च महाविद्यालये 

    आहेत, शाळा वेगळ्या. मग विचार करूयात आपण सर्वांनी ठरवलं तर वर्षाला किती पेजेस वाचवू शकतो

    व्हाया जाण्यापासून ‘ही गोष्ट छोटी वाटेल पण डोंगरा एवढी मोठी नक्कीच आहे’. कायझेन हेच तर  

    सांगतं छोट्या गोष्टीतून सुरुवात केली तर कालांतरान मोठा परिणाम दिसून येतो)

४)    आपला क्लास झाल्यानंतर जाताना त्या वर्गातील लाईट्स व फॅन बंद करून जाणे. (अर्थात विद्यार्थी सुद्धा जाणार असतील तर किंवा तो त्या दिवसातील शेवटचा क्लास असेल तर)

५)    ऑफीस स्टाफ मधील एखादा व्यक्ती आपल्या महाविद्यालयाच्या कामकाजासाठी विद्यापीठात जात असेल तर जाताना तो अजून इतर महत्वाच्या विभागाशी चर्चा करून कोणाची काही कागदपत्रे वैगेरे विद्यापीठात द्यायची आहेत का? असं विचारू शकतो याने आपल्याच महाविद्यालयातील इतर सहकाऱ्याचा वेळ व पैसा वाचू शकतो तसेच तो दुसरा कर्मचारी आपला वेळ इतर महत्वपूर्ण कामात देऊ शकेल. (असा एकमेकांचा विचार करण्यातून एक चांगली ‘कार्य संस्कृती’ (वर्क कल्चर/Work Culture) तयार होईल तो फायदा वेगळाच)

६)     आणि इतर ....(ही यादी खूप मोठी होऊ शकेल आपआपल्या शाळेच्या / महाविद्यालयाच्या / संस्थेच्या गरजेनुसार)

प्राध्यापक सुरेश संकपाळ यांच्या ब्लॉगची लिंक - https://www.psychologywayofpositivelife.com/2023/11/blog-post_21.html

 

  

प्रा. सोमनाथ पाटील

सहाय्यक प्राध्यापक, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

केंद्र समन्वयक- दूरशिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

           


Tuesday, October 24, 2023

 

World Mental Health Day 2023

10th Oct. 2023

Organised by

Shikshanmaharshi Bapuji Salunkhe Mahavidyalay, Karad

At Sansthamata Sudhiladevi Salunkhe Auditorium

Introductory Speech : Mr. Somnath Patil

Fecilitation Resource Person : Mrs. Shailaja Patil

                                                Psychologists, Krishna Hospital Karad

Presidential Address : Dr. Mahesh Gaikwad 

                                                I/C Principal SBS College, Karad

                                                Member of Management Committee, Shri Swami Vivekanand  

                                                Shikshan Sanstha, Kolhapur

Vote of Thanks : Dr. Swati Morkal  












Thursday, July 20, 2023

 


    मानसशास्त्र - मानसिक प्रक्रिया व मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारे एक शास्त्र. शास्त्र म्हणजे विज्ञान यासाठीच की याच्यामध्ये इतर विज्ञानाच्या शाखांप्रमाणे प्रयोग, निरीक्षणे केली जातात. या अर्थाने हे एक नॅचरल सायन्स ही आहे व मानव्यविद्या शाखा सुद्धा आहे ज्यात सामाजिक वर्तन, अभिवृत्ती, कौशल्य, अभिरुची, ताण तणाव व्यवस्थापन, करियर यांसारख्या मानवी दैनंदिन जीवनाशी निगडित असणाऱ्या समस्यांचा व त्यांच्या उपायांचा अभ्यास केला जातो.

 

      अगदी सुरुवातीला म्हणजे प्लेटो, अॅरिस्टॉटल पासून मानवी व्यवहारांचा आणि वर्तनाचा अभ्यास केला जात होता पण त्याकाळी हा विषय तत्वज्ञानामध्ये येत असे. जर्मनीमध्ये लीपझिंक येथील प्रयोगशाळेत १८७९ ला पहिल्यांदा विल्यम वूंट या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्रीय प्रयोगाला सुरुवात केली तर त्याच सुमारास अमेरिकेमध्ये विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाने ' प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी' हा ग्रंथ लिहून मानसशास्त्र विषयाचा पाया रचला. त्यानंतरच्या काळात सिग्मंड फ्रॉईड  अल्बर्ट एलिस, कार्ल युंग, अँडलर, अल्बर्ट बांडुरा, एरिक एरिकसन या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मानसशास्त्राचे सिद्धांत मांडले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानसशास्त्रामध्ये सिद्धांत निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली ज्यात अध्ययन कसे होते व त्याचे प्रकार, स्मृती प्रक्रिया व त्याचे प्रारूप, व्यक्तिमत्व म्हणजे काय? व त्याचे प्रकार, भावना व भावनांचे प्रकार, भावना व अंतर्स्त्रावी ग्रंथी यांचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम, प्रेरणा व प्रेरणांचे प्रकार, मानवी जीवनात प्रेरणांचे असणारे महत्त्व, एखाद्या प्रसंगाचे, घटनेचे, वस्तूचे होणारे संवेदन, संवेदनाच्या मुळाशी असणारे वेदन व अवधान ही शारीरिक स्थिती, चुकीच्या संवेदनातून होणारा भ्रम / भास (Illusion) तर अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीचे होणारे संवेदन म्हणजे विभ्रम (Hallucination) यांसारख्या असंख्य संकल्पनांची सिद्धांताची निर्मिती झाली.

 

     तर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या सर्व सिद्धांताचा मानवी जीवनात कसे उपयोजन करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला जसे अध्ययन कसे होते? अध्ययनाचे प्रकार कोणते हे समजल्यानंतर 'अध्ययन कौशल्य' आत्मसात करणे सुरू झाले. स्मृती आणि स्मृतीची प्रक्रिया समजल्यामुळे 'स्मृती सुधार तंत्रे ' अस्तित्वात आली. वैद्यकशास्त्राच्या विकासातून आज मोठ्या प्रमाणात मनोविकारांवरती औषधे उपलब्ध झाली आहेत.

 

     वैकासिक मानसशास्त्रामध्ये तर मातेच्या गर्भात भ्रुणाची निर्मिती होण्यापासून ते त्याचा जन्म, शिशु अवस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यवस्था व वृद्धावस्था या सर्व अवस्थांमध्ये शारीरिक-मानसिक-भावनिक व सामाजिक स्थित्यंतराचा अभ्यास केला जातो. स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे याने तब्बल 30 वर्षे शेकडो बालकांचा अभ्यास केला, वैकासिक मानसशास्त्राचे अनेक सिद्धांत हे जीन पियाजेच्या अनेक वर्षांच्या निरीक्षण, प्रयोग व त्याच्या अथक परिश्रमातून तयार झाले आहेत.

 

    तर असे हे मानसशास्त्र जे आपल्या जन्माच्या अगोदर पासून ते आपल्या जन्मानंतर मृत्यूपर्यंत आपल्या प्रत्येक मानवी प्रक्रियेचा व वर्तनाचा अभ्यास करते मानसशास्त्राच्या सामान्य मानसशास्त्र (मूलभूत सिद्धांत),  वैकासिक मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, इत्यादी शाखांचा अभ्यास केलेला पदवी व पदव्युत्तर पदवी घेतलेला विद्यार्थी आता स्वतःस ओळखण्यास सक्षम होतो जो स्वतःस चांगल्या पद्धतीने ओळखतो, आपण आज जे काही आहोत ते कशामुळे आहोत, आपल्या वर्तनामागे कोणत्या प्रेरणा आहेत, आपण आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो का? आपल्या भविष्यावरती आपले नियंत्रण आहे का? असेल तर किती प्रमाणात. इत्यादी 'स्व' शी संबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकतो. जो स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो तो इतरांनाही ओळखण्यास सक्षम होतो. त्यातून त्याला इतरांच्या वर्तनामागील असणाऱ्या कारणांचा शोध लागू शकतो आणि एकदा हे कारण समजले की मग त्या व्यक्तीशी कसे व्यवहार करायचे हेही त्याला समजू शकते. यातून त्याचे इतरांशी असणारे नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल जे सामाजिक जीवनात खूप महत्त्वाचे आहे. यातुन त्याच्यासाठी करियरच्या अनेक वाटा सुरु होतात.

 

    चला तर मग अशा आत्माविष्काराकडे (Self-Actualization) घेऊन जाणाऱ्या मानसशास्त्राच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करूयात.

 

     प्रा. सोमनाथ पाटील

                    एम.ए. सेट (मानसशास्त्र)

                   सहाय्यक प्राध्यापक

                  शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

Monday, October 10, 2022

 World Mental Health Day

10/10/2022


Chief Guest-Dr. Shivram Mestri


Principal Capt. Dr. Mahesh Gaikwad


Thursday, October 10, 2019

           Physical & Mental Health

2019-2020


Prof. Dr. Mahendra Kadam Patil


Dr. Kalidas Patil 




कायझेन, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-विद्यार्थी

  कायझेन, शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक-विद्यार्थी कोणतीही गोष्ट एका रात्रीत घटक नसते त्याच्या पाठीमागे कितीतरी वर्षांची तयारी असते . मग ती ...